Monday, 17 August 2020

शिवाजी विद्यापीठात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती प्रशिक्षण ऑनलाईन कार्यशाळा उत्साहात

 

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याचे ऑनलाईन प्रशिक्षण देताना श्रद्धा पोंबुर्लेकर 

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती ऑनलाईन प्रशिक्षणावेळी डॉ. पल्लवी भोसले, श्रद्धा पोंबुर्लेकर, पर्यावरण अधिविभागप्रमुख डॉ. आसावरी जाधव.

प्रशिक्षणांतर्गत बनविण्यात आलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती.


कोल्हापूर, दि. १७ ऑगस्ट: शिवाजी  विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या वतीने नुकतेच (दि. १४ ऑगस्ट) पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळेचे ऑनलाइन स्वरुपात आयोजन करण्यात आले. या उपक्रमात सुमारे १२५ जणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रशिक्षण घेतले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश उत्सव तोंडावर असला तरी यंदा कोविड-१९ च्या जागतिक महामारीमुळे या वर्षी लोकांना बाहेरून गणेश मूर्ती खरेदी करणे अवघड झाले  आहे. तसेच, प्लास्टर ऑफ  पॅरिसच्या गणेश मूर्ती आणणे  म्हणजे पाणी  प्रदूषणाला खतपाणी घालण्यासारखेच. या पार्श्वभूमीवर, घरच्या घरी सोप्या पद्धतीने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कशा बनवाव्यात, याचे ऑनलाईन प्रशिक्षण पर्यावरणशास्त्र विभागातर्फे आयोजित करण्यात आले.

कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक श्रद्धा पोंबुर्लेकर यांनी सहभागींना ट्री गणेशा व नारळापासून तयार करता येतील, अशा मूर्ती करण्याबाबत मार्गदर्शन केले. शाडूची गणेश मूर्ती बनवून ती वाळल्यानंतर त्यामध्ये फुलांच्या बिया खोवून या मूर्तीची निर्मिती करण्यात येते. या गणेश मूर्तींचे घरीच एखाद्या कुंडीमध्ये विसर्जन करून त्यावर पाणी घातल्यानंतर या मूर्तीची परत माती बनते आणि यामधे  खोवलेल्या बिया रुजून येतात. ही रोपे आणि  फुले आपल्याला निरंतर आनंद देत राहतात. त्याचप्रमाणे त्यांनी शहाळी आणि केळीचा बुंधा यांपासून घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने गणपती कसा बनवता येईल, याचेही प्रात्यक्षिक दाखविले. निसर्गातून निर्माण केलेली गणेश मूर्ती परत निसर्गात कोणत्याही हानीविना विसर्जित करणे आणि ती परत करताना त्यातून निसर्गाचे महत्त्व जपणे, त्यातून आणखी काही निसर्गाला देणे हे  ह्या  कृतीतून साध्य होते.

कार्यशाळेत  पर्यावरणशास्त्र  विभागाच्या ९० विद्यार्थ्यांसह अन्य असे एकूण १२५  जण सहभागी झाले. अत्यंत चांगला प्रतिसाद लाभला.

यावेळी पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रभारी विभागप्रमुख डॉ. आसावरी जाधव यांनी प्रास्ताविक केले आणि डॉ. पल्लवी भोसले यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी  माजी विभागप्रमुख डॉ. पी. डी.  राऊत यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment