Sunday, 9 August 2020

शिवाजी विद्यापीठातील शिक्षण संधी-३: विदेशी भाषा विभाग

विदेशी भाषा शिक्षण: व्यक्तिमत्व विकास व करिअरच्या संधी

 (शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिविभागांची प्रवेश प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. त्या अनुषंगाने या अधिविभागांची माहिती विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी थोडक्यात क्रमशः देत आहोत. तपशीलवार माहितीसाठी विद्यार्थी-पालकांनी संबंधित अधिविभागाशी संपर्क साधावा.- जनसंपर्क अधिकारी)


'वुईथ लव्ह फ्रॉम रशिया' या रशियन शिष्टमंडळाने शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागाला भेट दिली. त्यावेळचे छायाचित्र.
 

बहुभाषिकता आधुनिक मानवासाठी एक जैविक, नैसर्गिक वरदान आहे. दुसरी भाषा आत्मसात करताना मेंदूत होणाऱ्या प्रक्रियांतून विविध प्रकारच्या बौद्धिक क्षमता वाढतात. स्मृती सुधारते. लक्ष केंद्रित होण्याची क्षमता वाढते. समस्या सोडवण्याचे कौशल्य वाढते. एकभाषिक व्यक्तीपेक्षा बहुभाषिक व्यक्ती शब्दसंग्रह, वाचन व गणित विषयांत अधिक निपुण असतात. सतत एका भाषेतून दुसऱ्या भाषेत ‘स्वीच’ करण्याच्या सवयीने बहुकार्यप्रवणता क्षमता वाढते. व्यक्ती अधिक तर्कसंगत, विवेकी बनते. निर्णयक्षमता वाढते. ग्रहणशीलता, आकलनशक्ती वाढते. सभोवतालच्या जगाकडे पाहण्याची दृष्टी अधिक व्यापक होते. अलीकडील संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की, बहुभाषिकतेमुळे अल्झायमर व डिमेन्शिया हे आजार होण्याची शक्यता एकभाषिक लोकांपेक्षा कमी होते. विदेशी भाषा शिकण्यातून आपले मातृभाषेचे ज्ञान अधिक बहुमितीय, सखोल होते. एकूणच भाषेचे तंत्र, रचना समजते.

शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागात रशियन, जर्मन, जपानी, पोर्तुगीज व फ्रेंच भाषा शिकण्याची संधी उपलब्ध आहे. तिथे भाषा शिकताना त्या देशाचा भूगोल, इतिहास, समाज जीवन, जनमानस असे खूप काही समजत जाते. शब्दांमधून, पाठांमधून, वर्गातील दररोजच्या अभ्यासातून आपण हळूहळू एका नव्या संस्कृतीकडे पावले टाकत असतो. विदेशी भाषेचे ज्ञान व्यक्तीला एका नव्या संस्कृतीशी जोडते. ती देशाच्या सीमांबाहेर डोकावण्याची एक खिडकी असते. त्यामुळे विदेशी भाषा अध्ययन प्रक्रियेत अलीकडे अनेक दृक-श्राव्य साधनांचा, विविध माध्यमांचा वापर होतो. त्यात व्हिडीओ-क्लिप, माहितीपट, चित्रपट हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे.

विदेशी भाषा विभागात अनेकदा विदेशी पाहुण्यांसोबत चर्चेचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यातून परक्या संस्कृतीच्या व्यक्तीशी प्रत्यक्ष संवाद साधता येतो. नवी भाषा व संस्कृती सखोलपणे समजून घेता येते. ‘कार्निवल’सारख्या कार्यक्रमाअंतर्गत विविध विदेशी भाषा शिकणारे विद्यार्थी-शिक्षक त्या त्या देशांतील कलावस्तुंचे प्रदर्शन करतात. संगीत, नाटक, नृत्य यांचे प्रभावी सादरीकरण करतात. इतकेच नाही तर पाककलेच्या वर्गात विविध देशांचे पारंपरिक खाद्यपदार्थ बनवायला, चाखायला शिकतात.

शिवाजी विद्यापीठात विदेशी भाषा विभागाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून ‘दृष्टी हा उपक्रम आयोजित केला जातो. या उपक्रमातून अनेक उत्तम दर्जाचे  आशयसंपन्न चित्रपट विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शित केले जातात. चित्रपट हे विश्व संस्कृती समजून घेण्याचे माध्यम आहे. विद्यार्थ्यांची दृष्टी विकसित करण्यासाठी, त्यांची विवेकी मानसिक घडण होण्यासाठी ते अतिशय प्रभावी शैक्षणिक साधन आहे. चित्रपट पाहताना माणूस दृश्य आणि त्यामागील कथन यांचा गंभीरपणे विचार करायला शिकत जातो. त्यासाठी जगभरातील सशक्त, सकारात्मक आशयप्रधान चित्रपट आपल्याला मदत करतात. यातून आपण सांस्कृतिक बहुविधतेचा आदर करायला शिकतो. इतरांची संस्कृती आपल्यापेक्षा वेगळी आहे, पण ती श्रेष्ठ वा कनिष्ठ नसते. परिघाबाहेरचे, परक्या भाषा-संस्कृतीचे चित्रपट आपल्याला लोकशाहीवादी, भेदभावविहीन, समतावादी व हिंसामुक्त अवकाश निर्माण करायची प्रेरणा देतात. यातूनच एक प्रगल्भ माणूस घडत जातो. 

या सर्व बाबींबरोबरच करिअरमधील अनेक संधी आपल्यासमोर येतात. कोणत्याही आर्थिक गुंतवणुकीशिवाय केवळ विदेशी भाषेचे ज्ञान, त्या भाषेचे संवाद कौशल्य यातून भाषांतर, दुभाषा या क्षेत्रात आपण काम करू शकतो. पर्यटन क्षेत्र, हॉटेल उद्योग, आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रकल्प, निर्यात क्षेत्र अशा ठिकाणी रोजगाराच्या संधी प्राप्त होतात. इंटरनेटवर ऑनलाईन जगभरातील कंपन्यांसाठी भाषांतराची कामे करून आपण अर्थप्राप्ती करू शकतो. मात्र त्यासाठी चिकाटीने, सातत्याने भाषेवर प्रभुत्व मिळवण्याची गरज असते. आणि मळलेल्या वाटा सोडून अनवट पायवाटा चोखाळण्याची तयारी हवी.

विभागाचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. काही जपान, जर्मनी, रशिया या देशांना भेट देऊन आले आहेत.

विदेशी भाषा अवगत असणारे लोक दोन देशांमधील सांस्कृतिक, राजकीय, व्यापारी दुवा बनतात. आपल्या देशाच्या सीमेबाहेरील लोक कसे जगतात, कसे विचार करतात हे समजून आणि समजावून देणारा महत्त्वाचा स्त्रोत बनतात. हा स्त्रोत सशक्त करायला हवा. समृद्ध करायला हवा.


-       डॉ. मेघा पानसरे,

विभागप्रमुख,

विदेशी भाषा विभाग,

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

 

 

सन २०२० -२०२१ प्रवेश माहिती

 

अभ्यासक्रमाचे नाव

कालावधी

प्रवेश क्षमता

पात्रता

शुल्क  रू.

वार्षिक

१.

सर्टिफिकेट कोर्स इन रशियन

१ वर्ष

50

१२वी उत्तीर्ण/ समकक्ष

1904

२.

सर्टिफिकेट कोर्स इन  जापनीज  

(स्वावलंबी तत्वावरील)

१ वर्ष

50

१२ वी उत्तीर्ण/ समकक्ष

5629

३.

सर्टिफिकेट कोर्स इन जर्मन 

(स्वावलंबी तत्वावरील)

१ वर्ष

50

१२ वी उत्तीर्ण/ समकक्ष

5629

४.

सर्टिफिकेट कोर्स इन फ्रेंच

(स्वावलंबी तत्वावरील)

१ वर्ष

50

१२ वी उत्तीर्ण/ समकक्ष

5129

५.

सर्टिफिकेट कोर्स इन पोर्तुगिज

(स्वावलंबी तत्वावरील)

१ वर्ष

50

१२ वी उत्तीर्ण/ समकक्ष

5129

६.

डिप्लोमा कोर्स इन रशियन

१ वर्ष

15

सर्टिफिकेट कोर्स इन रशियन उत्तीर्ण

2004

७.

डिप्लोमा कोर्स इन जापनीज

(स्वावलंबी तत्वावरील)

१ वर्ष

15

सर्टिफिकेट कोर्स इन  जापनीज  किंवा JLPT – N5

6104

८.

डिप्लोमा कोर्स इन  जर्मन

(स्वावलंबी तत्वावरील)

१ वर्ष

15

सर्टिफिकेट कोर्स इन जर्मन  उत्तीर्ण

6104

९.

हायर डिप्लोमा कोर्स इन रशियन

१ वर्ष

15

डिप्लोमा कोर्स इन रशियन उत्तीर्ण

2104

१०.

एम.ए. (रशियन)

२ वर्षे

15

कोणत्याही विद्याशाखेची पदवी व  हायर डिप्लोमा कोर्स इन रशियन उत्तीर्ण.

* प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण

विद्यापीठ नियमा

नुसार

 

 

 

 

इतर माहिती:

§  सर्टिफिकेट/ डिप्लोमा/ हायर डिप्लोमा प्रवेशासाठी TC/MC ची गरज नाही. इतर अभ्यासक्रम व नोकरी करणाऱ्यांनाही प्रवेश घेता येतो.

§  रशियन / जर्मन / जपानी / फ्रेंच भाषा वर्ग आठवड्यातून ५ दिवस. सायंकाळी रोज १ तास.

§  पोर्तुगीज भाषा वर्ग आठवड्यातून २ दिवस. प्रत्येक शुक्रवार-शनिवार सायं. ५.०० ते ७.३०.

§  विभागीय ग्रंथालय, अत्याधुनिक भाषा प्रयोगशाऴा व इतर साधने उपलब्ध

§  सूचना: वरील अभ्यासक्रमांस विद्यापीठ ग्रंथालय व विद्यार्थी-विद्यार्थिनी वसतिगृह सुविधा उपलब्ध नाही.

 

 


No comments:

Post a Comment