Sunday, 31 October 2021

सरदार पटेल, इंदिरा गांधी यांना

शिवाजी विद्यापीठात अभिवादन

 

शिवाजी विद्यापीठात सरदार पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील.

शिवाजी विद्यापीठात सरदार पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या स्मृतींना अभिवादन प्रसंगी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. आर.व्ही. गुरव यांच्यासमवेत शिक्षक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थी. 


कोल्हापूर, दि. ३१ ऑक्टोबर: भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी या निमित्त या दोहो नेत्यांना शिवाजी विद्यापीठात आज आदरांजली वाहण्यात आली.

कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. अभिवादनानंतर राष्ट्रीय एकता दिनानिमित्त उपस्थितांनी एकता व सद्भावना यांची शपथ घेतली. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, डॉ. पी.जे. पाटील, डॉ. प्रमोद कसबे यांच्यासह नॅनो सायन्स व तंत्रज्ञान स्कूलचे शिक्षक, विद्यार्थी, प्रशासकीय सेवक उपस्थित होते.

'ए.डी. सायंटिफिक इंडेक्स-२०२१'च्या क्रमवारीत

विद्यापीठाच्या कुलगुरू, प्र-कुलगुरूंसह ४८ संशोधक

 

डॉ. डी.टी. शिर्के, कुलगुरू


डॉ. पी.एस. पाटील, प्र-कुलगुरू


एडी सायंटिफिक क्रमवारीचे होमपेज


कोल्हापूर, दि. ३१ ऑक्टोबर: जागतिक पातळीवरील ए.डी. सायंटिफिक इंडेक्स-२०२१तर्फे जाहीर करण्यात आलेल्या जागतिक संशोधकांच्या अद्यावत क्रमवारीत शिवाजी विद्यापीठातील कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह एकूण ४८ वैज्ञानिक, संशोधकांचा समावेश झालेला आहे.

अमेरिकेच्या मिशीगन विद्यापीठातील प्रा. मूरत आल्पर आणि प्रा. सिहान डॉजर या दोघांनी संयुक्तपणे आल्पर-डॉजर सायंटिफीक इंडेक्स तथा ए.डी. सायंटिफिक इंडेक्सविश्लेषित केलेला आहे. त्यासाठी त्यांनी गुगल स्कॉलरवरील संशोधकांचा गेल्या पाच वर्षांतील एच-इंडेक्स, आय-टेन इंडेक्स हे निर्देशांक तसेच सायटेशन स्कोअर (उद्धरणे) इत्यादी बाबींचे पृथक्करण केले. जगातल्या १३,५४२ शैक्षणिक संस्थांमधील ५,६५,५५३ संशोधकांचा डाटा त्यांनी संकलित केला. कृषी व वने, कला व स्थापत्य, वाणिज्य व व्यवस्थापन, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, इतिहास, तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, कायदे अभ्यास, वैद्यकीय व आरोग्य विज्ञान, नैसर्गिक शास्त्रे व सामाजिक शास्त्रे यांसह अन्य २५६ उपशाखांमधील संशोधकांचा समावेश या मानांकनामध्ये करण्यात आला आहे. त्यातून वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रँकिंग-२०२१ जाहीर करण्यात आले आहे.

अत्यंत व्यापक स्तरावर घेण्यात आलेल्या या क्रमवारीमध्ये ++’ मानांकित शिवाजी विद्यापीठाच्या ४८ संशोधकांचा समावेश होणे ही महत्त्वाची बाब आहे. या संशोधकांत स्थान प्राप्त करणारे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के संख्याशास्त्र विषयातील एकमेव संशोधक ठरले असून प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांना मटेरियल सायन्स, सौरघट, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, गॅस सेन्सर आणि नॅनोविज्ञान व तंत्रज्ञानातील संशोधनासाठी क्रमवारीत आघाडीचे स्थान प्राप्त झाले आहे. सदर क्रमवारीत रसायनशास्त्राचे ११, पदार्थविज्ञान व मटेरियल सायन्सचे ९, वनस्पतीशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जैवरसायनशास्त्र, नॅनो विज्ञान व तंत्रज्ञान, इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स या विषयांचे प्रत्येकी ३, प्राणीशास्त्र, पर्यावरणशास्त्र, धातूविज्ञान, अन्नविज्ञान व फार्मसी या विषयांचे प्रत्येकी २ आणि गणित व संगणकशास्त्राचे प्रत्येकी १ असे एकूण ४८ आजी-माजी संशोधक समाविष्ट आहेत.

या संदर्भात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की, शिवाजी विद्यापीठात विविध विषयांत अखंडित संशोधन सुरू असून त्याचे हे फलित आहे. यापूर्वीही स्टॅनफोर्ड विद्यापीठाने स्कोपस डाटाच्या आधारे जाहीर केलेल्या जगातल्या आघाडीच्या २ टक्के संशोधकांच्या यादीतही शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांचा समावेश होता. त्या संशोधन कार्याला ए.डी. सायंटिफिक इंडेक्समुळे पुष्टी लाभली आहे. विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांतील संशोधकांचे हे कार्य अभिनंदनीय आहे. यापुढील काळातही आपले संशोधनकार्य ते असेच चालवितील, असा मला विश्वास आहे.

 

ए.डी. सायंटिफिक इंडेक्स क्रमवारीत स्थान लाभलेले शिवाजी विद्यापीठातील संशोधक पुढीलप्रमाणे-

संख्याशास्त्र-

१.      डॉ. डी.टी. शिर्के

पदार्थविज्ञान, मटेरियल सायन्स व धातूविज्ञान-

१.      डॉ. पी.एस. पाटील

२.      डॉ. के. वाय. राजपुरे

३.      डॉ. सी.एच. भोसले

४.      डॉ. आण्णासाहेब मोहोळकर

५.      डॉ. एन. आय. तरवाळ

६.      डॉ. राजेंद्र सोनकवडे

७.      डॉ. टी.जे. शिंदे (के.आर.पी. महाविद्यालय, इस्लामपूर)

८.      डॉ. मानसिंग टाकळे

९.      डॉ. ए.बी. गडकरी (गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय, कोल्हापूर)

१०.  डॉ. विजया पुरी (धातूविज्ञान)

११.  डॉ. सोनल चोंदे (धातूविज्ञान व मटेरियल सायन्स)

 

रसायनशास्त्र-

        डॉ. के.एम. गरडकर

        डॉ. एस.एस. कोळेकर

        डॉ. ए.व्ही. घुले

        डॉ. एस.डी. डेळेकर

        डॉ. जी.बी. कोळेकर

        डॉ. डी.एम. पोरे

        डॉ. राजश्री साळुंखे

        डॉ. एम.बी. देशमुख

        डॉ. डी.एच. दगडे

१०    डॉ. गजानन राशीनकर

११    डॉ. अनंत दोड्डमणी

वनस्पतीशास्त्र-

१.      डॉ. एन. बी. गायकवाड

२.      डॉ. (श्रीमती) एन.एस. चव्हाण

३.      डॉ. डी.के. गायकवाड

 

जैवतंत्रज्ञान व बायोरिमेडिएशन-

१.      डॉ. एस.पी. गोविंदवार

२.      डॉ. ज्योती जाधव

३.      डॉ. नीरज राणे- जैवतंत्रज्ञान अधिविभागातील संशोधक विद्यार्थी (सध्या पुणे विद्यापीठात पोस्ट डॉक्टरल संशोधक)

प्राणीशास्त्र-

१.      डॉ. एम.व्ही. शांताकुमार

२.      डॉ. टी.व्ही. साठे

जैवरसायनशास्त्र-

१.      डॉ. के.डी. सोनवणे

२.      डॉ. पंकज पवार

३.      डॉ. (श्रीमती) पी.बी. दंडगे

इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स -

१.      डॉ. पी.एन. वासंबेकर (इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स)

२.      डॉ. टी.डी. डोंगळे (नॅनो-इलेक्ट्रॉनिक्स)

३.      डॉ. आर.आर. मुधोळकर (इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी)

नॅनोसायन्स व तंत्रज्ञान-

१.      डॉ. एस.बी. सादळे

२.      डॉ. एन.आर. प्रसाद

३.      डॉ. किरण कुमार शर्मा

पर्यावरणशास्त्र-

१.      डॉ. पी.डी. राऊत (पर्यावरणशास्त्र)

२.      डॉ. विजय कोरे (पर्यावरण अभियांत्रिकी)

अन्नविज्ञान व अभियांत्रिकी-

१.      डॉ. ए.के. साहू

२.      डॉ. राहुल रणवीर

संगणकशास्त्र-

१.      डॉ. एस.आर. सावंत

गणितशास्त्र-

१.      डॉ. के.डी. कुचे

फार्मसी-

१.      डॉ. जॉन डिसुझा (तात्यासाहेब कोरे फार्मसी महाविद्यालय, वारणानगर)

२.      संतोष पायघन

Saturday, 30 October 2021

तंत्रज्ञान अधिविभागातील ११ विद्यार्थ्यांची ‘टीसीएस’मध्ये निवड; ३.४ लाखांचे पॅकेज

 



कोल्हापूर, दि. ३० ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातील ११ विद्यार्थ्यांची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS)” या नामांकित मल्टिनॅशनल कंपनीत निवड झाली. त्यांना प्रत्येकी प्रतिवर्ष ३.४ लाख रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागात बी.टेक. अंतिम वर्षात (सन २०२१-२२) शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी टीसीएस कंपनीमार्फत निवड चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन या शाखेतून सुशांत जाधव, ऋषिकेश घडक, विरेन शहा, रोहित पाटील आणि जान्हवी नांदवडेकर या पाच विद्यार्थ्यांची, कॉम्प्युटर सायन्स व टेक्नॉलॉजी या शाखेतून कोमल पुरोहित, तेजल आंबोळकर, श्रेयस पाटील व ओंकार चौगुले या चार तर केमिकल टेक्नॉलॉजी शाखेतील अंकेष चौगुले आणि मेकॅनिकल इंजिनिरिंग शाखेतून आशुतोष शिरोळे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांची असिस्टंट सिस्टीम इंजिनिअर या पदावर निवड झाली असून प्रतिवर्ष ३.४ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे.

तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक व विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर. के. कामत, तंत्रज्ञान अधिविभागाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. एस. बी. सादळे, तसेच डॉ. पी.डी. पाटील, डॉ.ए.बी. कोळेकर, डॉ. रश्मी देशमुख आणि डॉ. श्यामकुमार चव्हाण यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. अमर डुम, चेतन आवटी, प्रशांत पाटील व एस.बी. काळे यांनी प्लेसमेंटसाठी प्रयत्न केले. कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील व कुलसचिव डॉ. व्ही. डी. नांदवडेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

विसाव्या शतकातील महाराष्ट्राचे केशवराव जेधे तेजस्वी पर्व: डॉ. अरुण भोसले

शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित व्याख्यानमालेत बोलताना डॉ. अरुण भोसले

शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित व्याख्यानमालेत बोलताना डॉ. अरुण भोसले


कोल्हापूर, दि. ३० ऑक्टोबर: विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय जीवनातील केशवराव जेधे हे तेजस्वी पर्व होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची योग्य दखल घेतल्याखेरीज आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास अपूर्ण आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ व विचारवंत डॉ. अरुण भोसले यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या गांधी अभ्यास केंद्राच्या वतीने संयोजित डॉ. उषा मेहता स्मृती व्याख्यानमाला-२०२१अंतर्गत देशभक्त केशवराव जेधे: कार्यकर्तृत्व या विषयावर ऑनलाईन व्याख्यानादरम्यान ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ होते.

डॉ. अरुण भोसले म्हणाले, महाराष्ट्राच्या जनमानसावर आपल्या व्यक्तीमत्त्वाचा तेजस्वी प्रभाव केशवराव जेधे यांनी प्रस्थापित केलेला होता. ते केवळ सामाजिक, राजकीय नेते होते, असे नव्हे; तर, लेखक, पत्रकार, शिक्षक, गीतकार, कवी, गायक असे बहुआयामी व्यक्तीमत्त्व त्यांना लाभलेले होते. सर्वसामान्यांशी संवाद साधण्याची अनोखी शैली त्यांना लाभलेली होती. त्यांची भाषा साधीसोपी, खोचक आणि परखड असे. निर्भयता आणि प्रामाणिकपणा ही त्यांच्या वक्तृत्व, लेखनाची वैशिष्ट्ये होती.

डॉ. भोसले पुढे म्हणाले, केशवराव जेधे यांच्या जीवनकर्तृत्वाचे प्रामुख्याने चार टप्पे होतात. सन १९१७-१८ ते १९२८-२९ या साधारण दशकभराच्या कालखंडात सत्यशोधक, ब्राह्मणेतर चळवळीचे त्यांनी जवळकरांच्या साथीने अत्यंत जोरकस नेतृत्व केले. ब्राह्मणेतर चळवळीला जहाल सुधारणावादी स्वरुप प्रदान करीत ही चळवळ महाराष्ट्रात सर्वदूर विस्तारित करण्याचे कार्य त्यांनी या काळात केले. त्यानंतर १९३० ते १९४८ या कालखंडात त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून काकासाहेब गाडगीळ यांच्या सहकार्याने राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व केले. पुढे काँग्रेसमधून बाहेर पडून १३ मे १९४८ रोजी तुळशीदास जाधव आणि शंकरराव मोरे यांच्या साथीने भारतीय शेतकरी कामगार पक्षाची स्थापना त्यांनी केली. काँग्रेसला सक्षम पर्याय उभा करण्याचा त्यांचा हा एक महत्त्वाचा प्रयत्न होता. सन १९५४मध्ये ते काँग्रेसमध्ये अर्थात स्वगृही परतले. कदाचित संघटनेत यावेळी त्यांना दुय्यम स्थान लाभले असेल, मात्र जनमानसावरील त्यांचा प्रभाव, सन्मान हा १२ नोव्हेंबर १९५९ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेईपर्यंत कायम राहिला. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील सर्वसामान्यांचे ते जणू दैवत बनलेले होते.

किशोर बेडकीहाळ
अध्यक्षीय भाषणात किशोर बेडकीहाळ म्हणाले, विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील जहाल नेते हे सनातन विचारांचे कट्टर समर्थक असल्याने जहाल म्हणजे सुधारणाविरोधी असे चित्र निर्माण झालेले होते. या पार्श्वभूमीवर केशवराव जेधे यांचे जहालपण हे सुधारणांच्या बाजूने, सुधारणांसाठीचे होते, हे लक्षात घ्यावे लागेल. त्यांचे नेतृत्व हे तत्कालीन सार्वजनिक जीवनात म्हणूनच वेगळे उठून दिसणारे आहे. जेधे हे हाडाचे कार्यकर्ते होते. लोकांमध्ये रमणे, संघटन करणे आणि लोकांना आपल्या बरोबर घेऊन जाणे, हा त्यांचा पिंड होता. म्हणूनच शेवटपर्यंत जनमानसातील नेतृत्व म्हणून त्यांचे स्थान अबाधित राहिले. डॉ. भोसले यांनी जेधे यांच्या चौफेर कार्यकर्तृत्वाची समग्र देखल घेत अत्यंत रास्तपणे, संयमाने तर्कतथ्यांनिशी केलेली मांडणी महत्त्वाची आहे.

यावेळी गांधी अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी स्वागत, प्रास्ताविक व परिचय करून दिला. डॉ. शिवाजी पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. एस.एस. महाजन, अशोक बाबर, डॉ. बी.एम. हिर्डेकर, दशरथ पारेकर, नंदा पारेकर, डॉ. अरुण शिंदे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.