Tuesday, 31 May 2022

महाराष्ट्राच्या लोकधारेने, दिवळी नृत्याने जिंकली मने;

लावणी, भांगड्याने चढविला कळस

 

महाराष्ट्राची लोकधारा सादरीकरणातील फुगडी नृत्य

महाराष्ट्राची लोकधारा

दिवळी नृत्य सादर करताना शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनी

दिवळी नृत्य सादर करताना शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनी

दिवळी नृत्य सादर करताना शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनी


महाराष्ट्र के रंग, पंजाब के संग उपक्रमाचा जल्लोषी समारोप

कोल्हापूर, दि. ३१ मे: गौरव समारंभानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आज शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले गोव्याचे दिवळी नृत्य (दीपनृत्य) आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक लोकधारेच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. आणि अखेरीस सादर झालेल्या महाराष्ट्राची लावणी आणि पंजाबी भांगडा नृत्याने कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू गाठला. उपस्थितांनी प्रचंड जल्लोषी प्रतिसाद या सादरीकरणास दिला.

आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरवात दिवळी या गोव्याच्या पारंपरिक लोकनृत्याने झाली. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी ते सादर केले. अत्यंत अवघड असा हा नृत्यप्रकार या विद्यार्थिनींनी अत्यंत नजाकतीने सादर केला. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आझादी हे प्रहसन (लघुनाटिका) सादर केले. स्वातंत्र्याचा अर्थ आणि महत्त्व त्यांनी याद्वारे अधोरेखित केला.

त्यानंतर लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाने भारतीय वाद्यवृंद सादर केला. या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र व पंजाबसह ईशान्य भारत, पश्चिम बंगाल, आसाम, राजस्थान, गुजरात, ओडिशा आदी राज्यांतील लोकसंगीताच्या विविध छटांचे दर्शन घडविले.

महाराष्ट्राची लोकधारा या अंतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या संघाने भूपाळीपासून ते वासुदेव नृत्य, शेतकरी नृत्य, कोकणचे बाल्या नृत्य, मंगळागौर, भारूड, धनगरी नृत्य, वाघ्या-मुरळी, जोगवा, गोंधळ, कोळीनृत्य अशा महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरांचे दर्शन घडविले आणि दर्शकांची मने जिंकली. पंजाबच्या संघाने शहीद भगतसिंगांच्या जीवन संदेशावर आधारित एकांकिका सादर केली. प्रतीक सिंह आणि गणेश चिंचकर यांनी अप्रतिम नक्कल सादर केली.

पंजाब व कोल्हापूरच्या विद्यापीठांनी संयुक्तपणे देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर केला. या गीतांनी सभागृहातील वातावरण पूर्णतः राष्ट्रभक्तीमय होऊन गेले.

अखेरच्या टप्प्यात या सांस्कृतिक आदानप्रदान उपक्रमाचा कळसाध्याय रचला तो लावणी व भांगडा या नृत्यांनी. उपस्थितांचा प्रचंड जल्लोषी प्रतिसाद या सादरीकरणांना लाभला आणि त्या उत्साहाच्या वातावरणातच या उपक्रमाचा समारोप झाला. डॉ. नीलेश सावे आणि हितेंद्र सिंग यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

 

'शिवाजी विद्यापीठ परिसर आणि कोल्हापुरी पाहुणचाराच्या प्रेमात पडलो'

गौरव समारंभात पंजाबच्या विद्यार्थ्यांची भावपूर्ण प्रतिक्रिया

पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाच्या संघाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिकृती भेट देऊन गौरव करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के.


 

कोल्हापूर, दि. ३१ मे: शिवाजी विद्यापीठाचा हिरवागार निसर्गरम्य परिसर आणि कोल्हापुरी पाहुणचार यांच्या आम्ही प्रेमात पडलो आहोत, अशी अत्यंत भावनिक प्रतिक्रिया पंजाबच्या विद्यार्थ्यांनी आज येथे व्यक्त केली.

आजादी का अमृतमहोत्सव आणि शिवाजी विद्यापीठाचा हीरक महोत्सव या निमित्ताने 'महाराष्ट्र के रंग, पंजाब के संग, या सांस्कृतिक आदानप्रदान उपक्रमाच्या गौरव समारंभात पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी ही भावना व्यक्त केली. शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात गेले दोन दिवस सुरू असलेल्या या सांस्कृतिक उपक्रमाचा आज भावपूर्ण समारोप झाला.

पंजाबचा विद्यार्थी नमनसिंह याने या प्रसंगी प्रातिनिधिक भावना व्यक्त केल्या. 'आम्हाला आमच्या लव्हली विद्यापीठाचा परिसर फार मोठा वाटत होता. मात्र, विद्यापीठाचा परिसर कसा असावा, ते शिवाजी विद्यापीठात आल्यानंतर लक्षात आले. इथला परिसर अत्यंत निसर्गसंपन्न व जैवविविधतेने समृध्द आहे. तो अत्यंत भुरळ पाडणारा आहे. त्याशिवाय, कोल्हापुरी पाहुणचार ही सुध्दा प्रेमात पाडणारी गोष्ट आहे. कोल्हापुरी माणसांचे प्रेम आम्ही आमच्या सोबत घेऊन जात आहोत. कोल्हापूरशी आमचा एक कायमस्वरूपी स्नेहबंध निर्माण झालेला आहे.

शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी सुमंत कुलकर्णी यानेही या सांस्कृतिक आदानप्रदान उपक्रमातून पंजाबसोबत मैत्र भावाचे नाते दृढ झाल्याची भावना व्यक्त केली.

यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, लव्हली विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा. सौरभ लखनपाल, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक  डॉ. आर. व्ही. गुरव आणि व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. योजना जुगळे यांच्या हस्ते लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठातील संघांतील विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्रे देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते प्रा. लखनपाल यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयाची प्रतिकृती प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी केवल यादव याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे अवघे X मि.मी. आकाराचे अत्यंत लहान पेंटिंग केले आहे. त्यासाठी त्याचे नाव 'आशिया बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये आले आहे. त्याच्या या यशाबद्दल कुलगुरू शिर्के यांच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आला.

'ध्यानधारणा करून रम्य परिसराचा आनंद'

पंजाबच्या विद्यार्थ्यांनी आज सकाळी संगीत व नाटयशास्त्र अधिविभागाच्या तलाव परिसरात ध्यानधारणा करून या परिसराचा आनंद सकाळी घेतला. फिरत असताना हे ध्यानधारणेचे हे दृश्य पाहून अतिशय समाधान वाटले, असे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी यावेळी सांगितले. आपल्या विद्यापीठाचा परिसर हा असा ध्यानधारणा आणि ज्ञानसाधना या दोहोंसाठी उपयुक्त आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मुंबई विद्यापीठाचे तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. नीलेश सावे आणि डॉ. आर.व्ही. गुरव यांनी या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी घेतलेल्या परिश्रमाबद्दल कुलगुरूंनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले.

'पारितोषिकाच्या रकमेचे विद्यार्थ्यांना समान वाटप'

लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाच्या कुलपतींनी शिवाजी विद्यापीठ संघास जे एक लाख रूपयांचे पारितोषिक दिले होते, त्यामध्ये आणखी भर घालून त्या रकमेचे संघातील सर्व विद्यार्थ्यांना समान वाटप करण्यात येणार असल्याची माहिती विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर. व्ही. गुरव यांनी यावेळी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना

शिवाजी विद्यापीठात अभिवादन

 


कोल्हापूर, दि. ३१ मे: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरी करण्यात आली.

आज सकाळी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी फगवाडा (पंजाब) येथील लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा. सौरभ लखनपाल, कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ.एम.एस. देशमुख, समाजशास्त्र अधिविभागप्रमुख तथा सामाजिक वंचितता व समावेशन केंद्राचे संचालक डॉ. जगन कराडे, डॉ.एम.टी. गोफणे, डॉ. किशोर खिलारे यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Monday, 30 May 2022

पंजाबी लोकसंस्कृतीच्या दर्शनाने कोल्हापूरवासीय नादावले अन् गहिवरलेही!

 

'महाराष्ट्र के रंग, पंजाब के संग' या उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठ संघाने भारतीय लोकवाद्यवृंद सादर केला.

'महाराष्ट्र के रंग, पंजाब के संग' या उपक्रमांतर्गत त्रिवेणी लोकवाद्यवृंद सादर करताना पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाचा संघ.

'महाराष्ट्र के रंग, पंजाब के संग' या उपक्रमांतर्गत सादर झालेल्या 'मैं. पंजाब बोलदा' या लघु-सांगितिकेमधील एक दृष्य.


कोल्हापूर, दि. ३० मे: शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात आज अक्षरशः पंजाबी लोकसंस्कृती अवतरली आणि तिने कोल्हापूरवासीयांना नादावून सोडले तर अखेरच्या क्षणी अगदी गहिवरुनही सोडले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह कोल्हापूरवासीयांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. कोविड-१९ साथीच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर विद्यापीठाचे हे सर्वाधिक क्षमतेचे सभागृह प्रथमच प्रेक्षकांनी तुडुंब भरले. 

निमित्त होते महाराष्ट्र के रंग, पंजाब के संग या विशेष सांस्कृतिक आदानप्रदान उपक्रमाचे. आजादी का अमृतमहोत्सव आणि शिवाजी विद्यापीठाचा हिरकमहोत्सव या निमित्ताने शिवाजी विद्यापीठ आणि फगवाडा (पंजाब) येथील लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ यांनी संयुक्तपणे हा उपक्रम आयोजित केला आहे. 

आज या उपक्रमाच्या औपचारिक उद्घाटन समारंभानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणास सुरवात झाली. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या संघाने 'राग यमन कल्याण'मधील विविध रचनांचे अत्यंत श्रवणीय सादरीकरण करून कार्यक्रमाची सुरेल सुरवात केली. लव्हली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी नूर-ए-ईश्क हा कव्वाली कार्यक्रम सादर केला. प्रेमाची विविध रुपे दाखविणाऱ्या अनेक लोकप्रिय आणि प्रसिद्ध कव्वालांच्या आवाजाने अजरामर केलेल्या कव्वालींचे फ्युजन सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले आणि कार्यक्रमात सुरवातीलाच अनोखा रंग भरला. त्यानंतर पारंपरिक पंजाबी लोकनृत्याचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. कृषीसंस्कृतीशी असणारे या नृत्याचे जवळचे नाते त्यांनी याद्वारे उलगडून दाखविले.

त्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी भारतीय लोकवाद्यवृंद सादर केला. यामध्ये महाराष्ट्र व पंजाबसह राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगढ, हरियाणा, तमिळनाडू या राज्यांतील विविध वाद्ये, नृत्ये आणि गीते असे तिहेरी सादरीकरण केले. या बहारदार सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर पंजाबच्या संघानेही त्रिवेणी लोकवाद्यवृंद सादर केला. यामध्ये पंजाबी गीते, वाद्ये आणि नृत्य असा तिहेरी संगम साधला आणि या पंजाबी संस्कृतीशी उपस्थित मनाने जोडले गेले. पंजाबच्या संघाने त्यानंतर दिल दा मामला या प्रहसनपर लघुनाटिकेतून आजच्या वास्तवावर झगझगीत प्रकाश टाकून उपस्थितांना हसवता हसवता अंतर्मुख केले. शिवाजी विद्यापीठाच्या विजयालक्ष्मी आणि गणेश चिंचकर यांनी नक्कल अर्थात मिमिक्री सादर केली.

अखेरीस मैं पंजाब बोलदा या लघु-सांगितिकेच्या माध्यमातून पंजाबचे अत्यंत अप्रतिम आत्मवृत्त विद्यार्थ्यांनी सादर केले. पंजाबच्या या कहाणीमध्ये त्याच्या निर्मितीपासून ते धर्मनिरपेक्ष भारताच्या जडणघडणीमधील त्याचे योगदान, पंजाबने सोसलेल्या फाळणीच्या वेदना, १९८४च्या दंगलीच्या झळा आणि त्यातून पुन्हा उभा राहिलेला पंजाब अशा अनेक बाबींचा समावेश होता. या सादरीकरणाने सर्व उपस्थितांचे अंतःकरण हेलावून गेले.

मुंबई विद्यापीठाचे तज्ज्ञ डॉ. नीलेश सावे आणि लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाचे हितेंद्र सिंग यांच्या नेटक्या आणि माहितीपूर्ण सूत्रसंचालनाने कार्यक्रम रंजक झाला. 

उद्या (दि. ३१ मे), या उपक्रमाच्या अंतिम दिवशीचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमाचा कोल्हापूरवासीयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांनी केले आहे.

जगात कुठेही शिका, पण देशकार्यासाठी सज्ज राहा: प्रा. सौरभ लखनपाल

 

शिवाजी विद्यापीठात 'महाराष्ट्र के रंग, पंजाब के संग' या उपक्रमाचे उद्घाटन करताना प्रा. सौरभ लखनपाल आणि कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. नीलेश सावे, जी.आर. पळसे, डॉ. आर.व्ही. गुरव, डॉ. बलप्रीत सिंह आणि डॉ. प्रकाश कुंभार.

शिवाजी विद्यापीठात 'महाराष्ट्र के रंग, पंजाब के संग' या उपक्रमाच्या उद्घाटन समारंभात बोलताना प्रा. सौरभ लखनपाल. मंचावर कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व मान्यवर. 

प्रा. सौरभ लखनपाल यांनी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह मान्यवरांना पंजाबी फलकारी (शाल) प्रदान केली.

शिवाजी विद्यापीठात 'महाराष्ट्र के रंग, पंजाब के संग' या उपक्रमाच्या उद्घाटन समारंभात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.



विद्यार्थ्यांच्या उत्साही प्रतिसादात महाराष्ट्र के रंग, पंजाब के संगचे उद्घाटन

कोल्हापूर, दि. ३० मे: विद्यार्थ्यांनी जगाच्या पाठीवर कुठेही शिकावे, मात्र आयुष्यात देशकार्यासाठी सदैव सज्ज राहावे, असे आवाहन फगवाडा (पंजाब) येथील लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विद्याशाखेचे वरिष्ठ अधिष्ठाता प्रा. सौरभ लखनपाल यांनी आज येथे केले.

आजादी का अमृतमहोत्सव आणि शिवाजी विद्यापीठाचा हिरक महोत्सव अशा संयुक्त निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र के रंग, पंजाब के संग या सांस्कृतिक आदान प्रदान उपक्रमाच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते. या उद्घाटन समारंभाला विद्यार्थी-विद्यार्थिनींचा अत्यंत उत्साही प्रतिसाद लाभला.

प्रा. सौरभ लखनपाल

विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्रा. लखनपाल म्हणाले, आज विद्यार्थ्यांनी देशासमोरील समस्यांवर विविध उपाय शोधण्याला प्राधान्य देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. असे उपाय घेऊन सामोरी येणारी पिढी आज देशाला हवी आहे. त्यासाठी संगीत, कला, नृत्य, साहित्य ही अत्यंत महत्त्वाची साधने आणि घटक आहेत. त्या दृष्टीने या साहित्यिक व सांस्कृतिक व्यवहाराकडे तरुणाईने अत्यंत गांभीर्याने पाहायला हवे.

प्रा. लखनपाल पुढे म्हणाले, शिवाजी विद्यापीठाशी लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाचे निर्माण झालेले सांस्कृतिक बंध हे काही आजचे नाहीत. त्याला खूप महान वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्र आणि पंजाब या दोन्ही राज्यांमध्ये अनेक शतकांपासून सांस्कृतिक बंध निर्माण झाले आहेत. महाराष्ट्राचे संत नामदेव यांनी केलेल्या ६१ रचना पवित्र गुरूग्रंथसाहिबमध्ये आहेत. गुरू गोविंदसिंहांबद्दल पंजाबमध्ये जितका आदर आहे, तितकाच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलही आहे. याशिवाय फलोत्पादनासह अनेकविध क्षेत्रांत ही दोन्ही राज्ये संयुक्तपणे काम करीत आहेत.

कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, कोविड-१९च्या साथीनंतर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात होणारा हा पहिलाच कार्यक्रम आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला एक आगळे महत्त्व आहे. हा स्पर्धेचा नव्हे, तर सांस्कृतिक आदानप्रदानाचा कार्यक्रम असल्याने अतिशय निकोप आणि स्पर्धेपेक्षाही उत्तम सादरीकरणाची दोन्ही विद्यापीठांच्या युवा कलाकारांकडून अपेक्षा आहे.

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी प्रा. लखनपाल यांचे ग्रंथभेट देऊन स्वागत केले. तर, प्रा. लखनपाल यांनी मंचावरील सर्वांनाच पंजाबची फलकारी ही वैशिष्ट्यपूर्ण शाल प्रदान केली.

यावेळी मंचावर लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाचे उप-अधिष्ठाता डॉ. बलप्रीत सिंह, शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, व संघ व्यवस्थापक डॉ. नीलेश सावे उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी वाहून तसेच दीपप्रज्वलनाने उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. श्रीमती व्हॅलेंटिना भार्गव यांनी सूत्रसंचालन केले तर व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रकाश कुंभार यांनी आभार मानले.

डोक्यावर महाराष्ट्रीय फेटा आणि गळ्यात पंजाबी फलकारी, हा दुर्मिळ क्षण

आज डोक्यावर महाराष्ट्रीय फेटा आणि गळ्यात पंजाबी फलकारी घालून मी आपणासमोर उभा आहे. हा माझ्या आयुष्यातील अत्यंत दुर्मिळ क्षण आहे. उत्तर भारत व पश्चिम भारताचा हा अनोखा मिलाप होतो आहे, याचा अतिशय आनंद वाटतो आहे, अशी भावना यावेळी प्रा. लखनपाल यांनी व्यक्त केली.

Sunday, 29 May 2022

'भाई, त्वाडा कोल्हापूर कित्ता चंगा सी !'

पंजाब येथील लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची कणेरीमठास भेट

न्यू पॅलेससमोर पंजाब येथील लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाचे विद्यार्थी



कोल्हापूरच्या सुप्रसिद्ध चप्पल लाईन येथे कोल्हापुरी चप्पल खरेदी करताना पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाचे विद्यार्थी.



 पंजाबी विद्यार्थ्यांची कोल्हापूर दर्शनानंतर उत्स्फूर्त प्रतिक्रिया


कोल्हापूर, दि. २९ मे: 'भाई, त्वाडा कोल्हापूर कित्ता चंगा सी !' अर्थात आपल्या कोल्हापुरी भाषेत सांगायचं तर 'भावा, तुमचं कोल्हापूर लै भारी' अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया पंजाबी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

आजादी का अमृतमहोत्सव आणि शिवाजी विद्यापीठाचा हिरक महोत्सव अशा संयुक्त निमित्ताने विद्यापीठातर्फे आयोजित  'महाराष्ट्र के रंग पंजाब की संग' हा उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमाअंतर्गत कोल्हापुरात पाच दिवसीय दौऱ्यासाठी दाखल झालेल्या पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी काल (शनिवारी) दिवसभरात कोल्हापुरातील विविध ठिकाणी भेट देऊन कोल्हापुरी संस्कृती आणि पाहुणचाराचा लाभ घेतला. यावेळी त्यांनी कणेरीमठ, न्यू पॅलेस, अंबाबाईचे मंदिर, रंकाळा आणि कोल्हापूर चप्पल लाईनला भेट दिली. 

लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी हे खाजगी विद्यापीठ असून विविध राज्यांतील आणि देशांतील मुलं इथे शिकायला येतात. शिवाजी विद्यापीठातील या उपक्रमासाठी पंजाब, हरियाणा, उ. प्रदेश, ओडिशा, हिमाचल, बिहार, मध्यप्रदेश, त्रिपुरा, आसाम, प. बंगाल आदी विविध राज्यातील विद्यार्थी कोल्हापुरात आलेली आहेत. कोल्हापुरचे दर्शन घेऊन येथील विविध ऐतिहासिक वारसा जाणून घेतला. या प्रवासाचा त्यांनी मनमुराद आनंद घेतला. 

कोल्हापुरी चपलांचे खास आकर्षण

कोल्हापूरला दिलेल्या भेटीची आठवण आणि घरच्यांसाठी करावयाच्या खरेदीमध्ये पाहुण्या विद्यार्थ्यांनी खासकरून कोल्हापुरी चपलांना पसंती दिली. याशिवाय हस्तकलेने युक्त अशा पर्स, पिशवी आणि कोल्हापुरी दागिने यांचीही  खरेदी करण्यास त्यांनी पसंती दिली. कोल्हापूरी चटपटीत मिसळ, भेळपुरी, वडापाव यांवर पंजाबी मुलांनी ताव मारला. महाराष्ट्राच्या डोंगरांवर पिकणाऱ्या काळी मैना अर्थात करवंदांची चव त्यांनी प्रथमच चाखली. ती त्यांनी खूप आवडीने खाल्ली. 

उद्यापासून दोन दिवस या विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कलाकारीचे दर्शन कोल्हापूरकरांना घडणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाने या विशेष उपक्रमाचे आयोजन केले आहे. 

Saturday, 28 May 2022

महाराष्ट्र के रंग; पंजाब के संग:

लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ संघाचे पारंपरिक वाद्यांच्या गजरात स्वागत

सांस्कृतिक आदान-प्रदान उपक्रमांतर्गत पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाच्या संघाचे स्वागत करताना शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील. सोबत डॉ. आर.व्ही. गुरव, डॉ. व्ही.एम. पाटील, डॉ. नीलेश सावे आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी.

लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाच्या चमूसमवेत शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील. सोबत डॉ. आर.व्ही. गुरव, डॉ. व्ही.एम. पाटील, डॉ. नीलेश सावे, डॉ. आसावरी जाधव, डॉ. निशा मुडे-पवार, डॉ. मीना पोतदार आदी. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात भगवा जरीपटका नाचविताना पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाचे विद्यार्थी.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात भगवा जरीपटका नाचविताना पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाचे विद्यार्थी. 

 


मर्दानी खेळांच्या सादरीकरणाने भारावले पाहुणे

कोल्हापूर, दि. २८ मे: आजादी का अमृतमहोत्सव आणि शिवाजी विद्यापीठाचा हिरकमहोत्सव या संयुक्त निमित्ताने आयोजित सांस्कृतिक आदान-प्रदान उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठात दाखल झालेल्या फगवाडा-पंजाब येथील लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाच्या चमूचे आज पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि मर्दानी खेळांच्या सळसळत्या जल्लोषी उत्साहात स्वागत करण्यात आले. या स्वागत व सादरीकरणाने पाहुणा संघ भारावून गेला.

लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाच्या संघाचे आज सकाळी महाराष्ट्राच्या पारंपरिक लेझीम व झांजपथकाच्या साथीने मिरवणुकीने वाजतगाजत शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात आगमन झाले. त्यानंतर त्यांचे शिवाजी विद्यापीठाच्या वतीने कुंकुमतिलक लावून औक्षण करण्यात आले व सर्व सदस्यांना पुष्पमाला घालण्यात आल्य़ा. विद्यापीठासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याच्या दर्शनाने पंजाबचे विद्यार्थी भारावले. मुख्य प्रशासकीय भवनासमोर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी पंजाबच्या संघाचे औपचारिक स्वागत केले. पंजाब संघाच्या वतीने प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनाही पंजाबी शाल प्रदान करण्यात आली.

या स्वागत सोहळ्यानंतर शिवाजी पेठेतील मर्दानीराजा सुहासराजे ठोंबरे आखाडा आणि श्री खंडोबा-वेताळ तालीम मर्दानी खेळ पथक यांनी कोल्हापूरभूषण वस्ताद आनंदराव ठोंबरे आणि संघनायक कृष्णात ठोंबरे व किरण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवकालीन युद्धकलेचे अर्थात विविधांगी मर्दानी खेळांचे अत्यंत चित्तथरारक व बहारदार सादरीकरण केले. शाहीर मिलिंदा सावंत यांच्या निवेदनाने कार्यक्रमात रंगत आली. आबालवृद्धांचा सहभाग असलेल्या या मर्दानी खेळांचे सादरीकरण पाहून पंजाबचे सदस्य अतिशय भारावून गेले.

यावेळी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, प्राचार्य डॉ. व्ही.एम. पाटील, डॉ. नीलेश सावे, डॉ. शिवाजी जाधव, लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाचे बलप्रीत सिंग, वैशाली कालरा यांच्यासह शिवाजी विद्यापीठाच्या संयोजन समितीचे सदस्य शिक्षक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या अत्यंत उत्साही स्वागत समारंभानंतर पाहुणा संघ कोल्हापूर दर्शनासाठी रवाना झाला.

दरम्यान, लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाच्या संघाचे काल रात्री आठ वाजता कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात आगमन झाले. त्यावेळी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांनी त्यांचे स्वागत केले.

कोल्हापूरची संस्कृती व परंपरा यांचा परिचय करून घ्या: प्र-कुलगुरू डॉ. पाटील

यावेळी पाहुण्या संघाला संबोधित करताना प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, आपण विद्यार्थ्यांनी आपल्या कोल्हापूर भेटीच्या कालखंडात कोल्हापूरला लाभलेला राजर्षी शाहू महाराज यांचा वारसा आणि त्यातून विकसित झालेली येथील पुरोगामी संस्कृती व परंपरा यांचा जवळून परिचय करून घेण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. तसेच, या पुढील काळात लव्हली प्रोफेशनल विद्यापीठासमवेत केवळ सांस्कृतिकच नव्हे, तर शैक्षणिक व संशोधकीय बंधही विकसित होतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी येथील निवास व भोजन व्यवस्था चांगली झाल्याचे विद्यार्थ्यांनी प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांना सांगितले.

पाहुण्या विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जयघोषात नाचविला भगवा जरीपटका

शिवकालीन युद्धकलेच्या प्रदर्शनाने पंजाबी विद्यार्थी इतके भारावले की कार्यक्रमाच्या शेवटी तेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करीत मैदानात उतरले. जय भवानी, जय शिवाजी आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत पंजाबच्या विद्यार्थ्यांनी अतिशय प्रेमाभिमानाने छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे प्रतीक असलेला भगवा जरीपटका ध्वज नाचविला. त्याभोवती इतर विद्यार्थी-विद्यार्थिनीही लेझीम खेळत फेर धरला. यावेळी साऱ्यांचाच उत्साह ओसंडून वाहात होता.


स्वातंत्र्यवीर सावरकर यांना

शिवाजी विद्यापीठात अभिवादन


 


कोल्हापूर, दि. २८ मे: शिवाजी विद्यापीठात आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम झाला.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये आज सकाळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉ. निशा मुडे-पवार, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. सुमेधा साळुंखे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

Friday, 27 May 2022

विशेष लेख:

महाराष्ट्र-पंजाबचा संस्कृती-संगम

 




 

(दि. २७ ते ३१ मे २०२२ या कालावधीत सांस्कृतिक आदानप्रदान उपक्रमांतर्गत पंजाब येथील लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा संघ शिवाजी विद्यापीठात येतो आहे. याअंतर्गत अनेक सांस्कृतिक उपक्रमांचे दर्शन घडणार आहे. या निमित्त एक विशेष लेख...)

 

भारत हा विविधतासमृद्ध देश आहे. अनेकविध भाषा, वेशभूषांसह प्रदेशानुसार बदलणाऱ्या संस्कृतीचे दर्शन इथे घडते. काश्मीरमधील बर्फाळ प्रदेशापासून राजस्थानातील उष्ण वाळवंटापर्यंत, सुंदरबनच्या खारफुटी वनांपासून सह्याद्री आणि आसाम, अरुणाचल प्रदेशातील घनदाट जंगलांपर्यंत आणि हिमालयाच्या उत्तुंग पर्वतरांगांपासून ते दख्खनचे पठार आणि तिन्ही बाजूंनी सागराने वेढलेली किनारपट्टी अशी भुरळ पाडणारी ही विविधता आहे. यामुळेच लोकांचा पेहराव, खाद्यसंस्कृती, राहणीमान यांमध्येही वेगळेपण आढळते. यातूनच प्रत्येक राज्याची, प्रांताची स्वतःची अशी स्थानिक लोकसंस्कृती विकसित झालेली आहे. या समग्र संस्कृतींचे काही धागे एकत्र येऊनच हजारो वर्षांच्या काळापासून भारतीय संस्कृती तिच्या विविधतेमध्येही एकता व अखंडता जोपासण्याच्या अंगभूत वैशिष्ट्यासह विकसित झालेली आहे.

भारतातील प्रत्येक नागरिकाने, विशेषतः तरुणाईने या देशाच्या या वैविध्यपूर्ण संस्कृतीबद्दल जाणून घ्यायला हवे. आपल्या प्रांतापेक्षा अन्य प्रांताची संस्कृती कशी वेगळी आहे, हे समजून घेतानाच त्या संस्कृतीशी आपले भारतीयत्वाचे बंध दृढमूल करण्यासाठी प्रयत्न करणे त्यांच्याकडून अभिप्रेत आहे. नेमक्या याच उद्देशाने कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने आपल्या स्थापनेचे हीरकमहोत्सवी वर्ष आणि आजादी का अमृत महोत्सवअशा संयुक्त निमित्ताने सांस्कृतिक आदान-प्रदान उपक्रमाचे आयोजन केले आहे. याअंतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या एकूण ४३ सदस्यांच्या संघाने पंजाब येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला दिनांक १० ते १४ एप्रिल २०२२ या कालावधीत भेट दिली. त्यावेळी दोन्ही विद्यापीठांच्या विद्यार्थी कलाकारांनी एकत्रितरीत्या आपल्या कलेचे सादरीकरण केले. महाराष्ट्रीयन संस्कृतीच्या सादरीकरणामध्ये लोकधारा (वासुदेव, गोंधळ, आराधी, भारुड इ.), लोकवाद्यवृंद, लोकनृत्य, लावणी, कव्वाली, मूकनाट्य, देशभक्तीपर लघुनाटिका, सुगम गायन तसेच भांगडा आदी कार्यक्रमांचा समावेश होता. शिवाजी विद्यापीठाच्या संघाने देवी तालाब मंदिर, कर्तारपुर येथील जंग-ए-आझादी मेमोरियल, अमृतसर येथील सुवर्णमंदिर, जालियनवाला बाग व वाघा बॉर्डर या ऐतिहासिक स्थळांना भेट दिली. जालियनवाला बाग परिसराला भेट दिली, तो दिवस नेमका बैसाखीचाच होता. सुमारे शंभर वर्षांपूर्वी त्याच दिवशी जनरल डायर याने भारतीय स्वातंत्र्यसैनिकांवर गोळीबार केला होता. त्यामुळे या भेटीचा प्रसंग अत्यंत हृद्य आणि अविस्मरणीय ठरला. वाघा बॉर्डरची भेटही अशीच महत्त्वाची. भारत-पाकिस्तान सीमेवरील परेड तर विद्यार्थ्यांनी पाहिलीच, पण परत निघण्यापूर्वी सीमा परिसरामध्ये स्वच्छता मोहीमही राबविली.

आता या सांस्कृतिक आदानप्रदानाचा पुढचा टप्पा शिवाजी विद्यापीठात 'महाराष्ट्र के रंग, पंजाब के संग' या कार्यक्रमांतर्गत साकार होत आहे. पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा संघ काल २७ मे रोजी रात्री कोल्हापुरात दाखल झाला असून आता उद्यापासून (दि. २८ मे) ३१ मे पर्यंत हा संघ विविध उपक्रमांत सहभागी होणार आहे. कोल्हापूर परिसरातील विविध ठिकाणी भेटी देऊन ऐतिहासिक, सांस्कृतिक परंपरांचा अभ्यास करणार आहे. या संघात ३५ विद्यार्थी, १४ तज्ज्ञ प्रशिक्षक आणि २ प्रतिनिधी असा ५१ जणांचा समावेश आहे. येथील चार दिवसांच्या वास्तव्यादरम्यान हे विद्यार्थी शिवाजी विद्यापीठ परिसरासह कणेरी मठ, न्यू पॅलेस, भवानी मंडप, अंबाबाई मंदिर, महाद्वार रोड, मोतीबाग तालीम, कोल्हापुरी चप्पल लाईन, रंकाळा आदी ठिकाणी भेटी देणार आहेत.

पंजाबचा संघ दि. ३० व ३१ मे रोजी कव्वाली, त्रिवेणी लोकसंगीत, झुमर, लोकनृत्य, भांगडा यांसारखे पंजाबची ओळख असणारे विविध कलाविष्कार सादर करणार आहे. यातून कोल्हापूरकरांना पंजाबच्या लोककलेची, लोकपरंपरेची आणि संस्कृतीची ओळख होईल.

हा उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांसह नागरिकांना परस्परांच्या संस्कृतीबद्दल जाणून घेण्याची संधी आहे. शिवाजी विद्यापीठाच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या यांसारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, त्यांच्या विचारांच्या कक्षा रुंदावतील, एकमेकांच्या संस्कृतीतील चांगल्या-वाईट गोष्टी समजून घेत संवेदनशीलता येईल, प्रांतवाद आणि भाषावाद कमी होण्यास मदत होईल. आणि खऱ्या अर्थाने या सांस्कृतिक बंधांमधून भारताची एकता आणि एकात्मतेची भावना दृढमूल होईल. 

उपक्रमाची वैशिष्ट्ये:-

> या उपक्रमाचे मूळ उद्दिष्टच संस्कृतीचे आदानप्रदान करणे, असे आहे. इथे कोणतीही स्पर्धा नसल्याने मुलांना सहजतेने आपल्या संस्कृतीची माहिती देत, त्यांच्या संस्कृतीबद्दलही जाणून घेता येईल. 

> देशाच्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शन विद्यार्थ्यांना होईल. 

> ‘आजादी का अमृतमहोत्सव साजरा करीत असताना कोणत्याही युवा स्पर्धेशिवाय एका विद्यापीठातील विद्यार्थ्यांना दुसऱ्या राज्यातील विद्यापीठात संस्कृतीची देवाणघेवाण करण्यासाठी पाठवण्याची ही पहिलीच घटना आहे. 

 

-    प्रिती निकम, प्रथमेश पाटील

वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभाग,

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर